कर्दळीवन परिक्रमा:

कुठे
श्रीशैल्यम, आंध्रप्रदेश

राज्य
आंध्रप्रदेश, भारत

जिल्हा
कर्नुल, आंध्रप्रदेश

कसे जाल?
हैदराबाद ते श्रीशैल्यम २१५ किमी अंदाजे

काही  दिवसापूर्वी माउंटन हायकर्स च्या आदित्यचा फोन आला होता, लॉक डाऊन च्या शिळोप्याच्या गप्पा झाल्यावर म्हणाला दादा आपण इतके ट्रेक करतो तुझ्या आवडत्या ट्रेक बद्दल काही लिहिशील का? दगड विटांच्या कामात रमणाऱ्या माझ्यासारख्या माणसाला हा अनुभव नवा होता म्हटले बघू काय उतरवता येते.

हल्ली कामाच्या व्यापातून सुद्धा महिन्या काठी एक ट्रेक करण्याचा नियमच ठरला होता. बहुतेक ट्रेक हे सह्याद्रीमधीलच असायचे अशात एक दिवस वर्गमित्र निशांतचा फोन आला, पुण्याचा Mountain Hikers नावाचा एक ट्रेकिंग ग्रुप आहे त्यांचा कर्दळीवन परिक्रमेचे आयोजन केले आहे , आपण जायचं का? मनात बरेच दिवस होत सुद्धा, गेल्याच २०१५ साली जाऊन एक याचा असफल प्रयत्न पण केला होता, त्यामुळे तिकडे असणारे सर्व समस्या माहित होत्या, त्यामुळे पटकन हो म्हणून टाकले. इतर काही मित्रांना या संबंधात विचारले शाळेतील वीरा आणि अनुपा तयार झाल्या. प्रत्येकाने आपले जाण्यायेण्याचे पैसे भरले तारीख ठरली. आदित्यकडून आलेल्या लिस्ट प्रमाणे सॅक भरली कपडे खाण्याचे सामान कमीजास्त करता सात ते आठ किलोची बॅग झाली आणि निघण्याचा दिवस उजाडला.

दिवस १:

सकाळी साडे अकराची ट्रेन होती दुसऱ्या दिवशी सकाळी ०६:०० वाजता हैद्राबादला पोहचवणार होती. वाटेत, पुण्यात इतर मंडळी चढणार होती माउंटन हायकर्स चे आदित्य आणि वल्लरी धरून दहा जण पुण्याचे होते आणि आम्ही मुंबईकर चार! दहा अनोळखी पुणेकरांसोबत जाण्याचा हा आमचा निर्णय तास धाडसीच होता. संध्याकाळी पुणेकर दुसऱ्या डब्यात चढल्याचे कन्फर्म झाले. पुढील हैद्राबाद पर्यंतचा प्रवास तसा आरामशीरच झाला.

दिवस २: 

सकाळी साडेसहा च्या सुमारास हैद्राबाद आले, ग्रुप लीडर आदित्य आणि वल्लरीला भेटलो सोबत इतर मंडळींसोबत जुजबी हाय हॅलो झाले, बस स्टॅन्ड कडे सगळे निघालो हैद्राबाद ते श्री शैल्यम साधारण सात ते आठ तासांचा प्रवास आहे. बस वेळेतच सुटली प्रवासाच्या शिणवठ्यामुळे बसमध्ये बसताच डुलकी लागली. जाग आली तेंव्हा बस शहर सोडून मुख्य रस्त्यावर सुसाट निघाली होती दुतर्फा विरळ वस्ती दिसत होती, तुरळक तेलगू पाट्या असणारी दुकाने छोट्या वस्त्या लागत होत्या. सगळा तसा पठारी प्रदेशच, वाटेत अनेक ठिकाणी पुरुषभर उंचीचे मोठाले पिवळट रंगाचे दगड एकावर एक असे रचून ठेवलेले दिसले हे मानवनिर्मित की नैसर्गिक ते कळू शकले नाही मात्र हा प्रकार बरीच ठिकाणी दिसला. मुख्य रस्त्यावरून आता गाडीने वळण घेतलं आणि दुतर्फा जंगल दिसू लागलं आमची बस अभयारण्यात शिरली होती. हेच ते नागार्जुना श्री शैल्यम टायगर रिझर्व्ह. जंगली श्वापदांच्या वावरामुळे रात्री या रस्त्यावर वाहतुकीला बंदी असते. वाटेत वाघ अस्वल बिबळ्या वगैरेंचे फोटो असणारे अनेक बोर्ड लागत होते.

साधारण पाच सहा तासांच्या प्रवासानंतर एक मोठे धरण दिसू लागले हे पाताळगंगा नदीवर बांधलेले आहे. या धरणाला अनेक वळणे घेत बस वर आली आता आम्ही श्री शैल्यम च्या वेशीत शिरलो होतो.

थोड्याच वेळात बस स्टॅन्ड वर पोहोचलो दुपार तशी रखरखीत वाटत होती. जेवण तिथल्याच हॉटेलात आटपून काही रिक्षांमध्ये बसून शारदा पिठम च्या दिशेने निघालो. या शारदा पिठम मध्ये भाविकांना राहण्याची उत्तम सोय केलेली आहे, देवीच्या मंदिराभोवती बांधलेली ही दुमजली इमारत आहे. मंदिराभोवतीचा सभामंडप त्या बाजूने मोठाले जिने कॉमन पॅसेजेस आजुबाचुचा शांत परिसर आणि सेल्फ कॅन्टेन्ड ट्वीन शेअरिंग अतिशय स्वच्छ खोल्या हे विशेष. आंघोळी आटपून थोडा आराम करून पाच वाजता भेटण्याचे ठरले. तरतरीत होऊन सर्व खाली सभामंडपात जमा झालो. ओळख परेड झाली, प्रत्येकाने आपल्याबद्दल थोडक्यत माहीती सांगितली.

सकाळी असणारा औपचारिकपणा आता बराच निवळला होता. गप्पा सुरु झाल्या होत्या. मल्लिकार्जुनाचे हे देऊळ जवळच होते. मोठ्या आवारात हे मुख्य मंदिर छोट्या मंदिरांनी वेढलेले आहे दाक्षिणात्य स्थापत्यकलेने बांधलेले भव्य गोपुर लांबूनही दिसून येते. साधारणतः इ. स .पूर्व ६०० काळात बांधलेले ह्या मंदिराचा विजयनगर काळात जीर्णोद्धार झाला. आताचा सभामंडप हा विजयनगर कालीन असे म्हणतात, आदी शंकराचार्यांनी शिवानंदलहरी येथेच रचल्याचा इतिहास आहे. सभामंडपात काळ्या दगडात बारीक कोरीव काम केलेले भव्य खांब आणि छत आहे. मुख्य प्रवेशद्वारासमोरील मोठ्ठा दगडी नंदी लक्ष वेधून घेतो. सध्या येथील काही भागांचे रेस्टोरेशन चे काम सुद्धा चालू आहे. मुख्य गाभारा हा छोटा असून आत स्वयंभू ज्योतिर्लिंग आहे ताज्या फुलांनी सुंदर सजवलेले शिवलिंगाचे दोन तासाच्या रांगेनंतर दर्शन झाले. मुख्य मंदिराच्या आजूबाजूला अनेकछोटी शिवलिंग असणारी मंदिरे आहेत.

दर्शन आटोपून मागील दाराकडून निघताना मिळालेला स्वादिष्ट प्रसाद खात शारदा पिठम कडे निघालो. संध्याकाळ झाली होती,आजूबाजूच्या अनेक मठ, देवळे यातून विष्णुसहस्त्रनाम तेलगू भजने किंवा सनईचे सूर ऐकू येत होते. एकंदरीतच सर्व वातावरण भक्तिमय होते. आठ वाजता पिठमच्या सभामंडपात जमा झालो, हे शारदापिठम सांभाळणारी मुख्य व्यक्ती चक्क मराठीत बोलत होती. पूर्वी मुंबईत नोकरी आणि शिवसेना शाखाप्रमुख राहिलेले हे सद्गृहस्थ निवृत्तीनंतर सध्या श्रीशैल्यम येथे कुटुंबासोबत आनंदात राहत आहेत. जेवणाची तयारी झाली होती मुर्तीसमोरील सभामंडपाशेजारील जागेत पंगत लागली. पोळी भात, दक्षिणी पद्धतीची भाजी, रस्सम, ताक, वेगळ्याच चवीचे लोणचे, पापड…एकंदरीत मेजवानीच होती.

II पवित्र ते अन्न I हरिचिंतनीं भोजन I तुका म्हणे चवी आले I जे का मिश्रित विठ्ठले II

या ओवीची आठवण झाली. तुडुंब जेवून सकाळी पाच वाजता उठण्याचे ठरवून आपापल्या खोलीत निघालो.

दिवस ३

सकाळी लवकर उठून रोपवे च्या दिशेने निघालो हा रोप वे खाली असलेल्या पाताळगनेच्या काठापर्यंत नेतो. खाली उतरून नदीच्या घाटावर आलो हीच ती पाताळगंगा सध्या आंध्रप्रदेश आणि तेलेंगाणा जिल्ह्यांच्या मधून जात होती,  पुढे जाऊन ही  कृष्णेला मिळते नदीचे पात्र बऱयापैकी मोठे होते नृसिंह सरस्वती याच नदीतून पलीकडील वनात तपश्चर्येसाठी गेले होते जाताना त्यांना गोल छोट्या नावेला कर्दळीच्या पानांनी सजवून बसवले होते यात बसून ते समोरील वनात गेले म्हणून ते कर्दळीवन, जंगलात खूप  चिखल असायचा म्हणून ते कदलीवन अशीही कथा आहे.

समोर लागलेल्या बोटी मध्ये बसून निघालो साधारण तासाभराच्या प्रवासानंतर व्यंकटेश किनारी लागलो.

किनाऱ्यावरच आप्पास्वामीचे घर होते, कुडाचे कौल झावळ्यांनी शाकारलेल्या घराच्या मोठ्या अंगणात आम्ही समान ठेवले आज आप्पास्वामी बाहेर गेले होते घरात त्यांचा मुलगा होता. गरम पोहे चहाची न्याहारी आटपून ट्रेक सुरु करायची तयारी केली.

सोबत वाटाड्या म्हणून दोन माणसे होती त्यांच्या कडे दोन दिवसाचे जेवणखाण भांडीकुंडी असे सामान होते पाठीवर लादून ही मंडळी पुढे निघाली आम्ही सुद्धा मागून सुरु झालो.

सुरवातीलाच दगडधोंड्यानी युक्त असा उभा चढ होता न्याहारीने भरलेल्या पोटामुळे सर्वांचीच दमछाक झाली सतत तासभर चढून गेल्यावर इंगळे ताईंना खूप धाप लागली प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी आणि त्यांचा मुलगा अभय यांनी खाली परत जाण्याचे ठरवले. त्यांना मागे ठेवून आम्ही पुढे निघालो.

आता  उन्ह चढू लागली होती झाडेझुडपे सोडून मध्येच उघड भाग येत होता सगळ्यांचंच घामटा काढणारा चढ शेवटी संपून पठारी भाग आला येथे विश्रांती घ्यायची ठरली सोबत आणलेल्या खाऊची देवाणघेवाण झाली.

आता पुढचा भाग तसा सपाट दिसत होता जंगल कमी होऊन उंच गवती भाग लागला नुकताच पाऊस संपल्यामुळे गवत झुडपे पण तरारली होती, पायवाट होती पण उंच गवतात शोधावी लागत होती चिकचिकीत झाली होती.

पुढे एका ठिकाणी आदित्यने सगळ्यांना थांबवले एका कुंपणात दगडावर व्यवस्थित एका पावलाचा ठसा होता हा स्वामींच्या पावलाचा ठसा आहे असे सांगण्यात आले सर्वानी तिथे पूजा केली आणि पुढे निघालो गवत आणखी उंच आणि घनदाट होऊ लागले.  वाटाड्याने येथे अस्वलांचा वावर असल्यामुळे सर्वानी अगदी एकत्र राहायला सांगितले थोडे भीतभीतच सगळे पुढे चालले होते गप्पा बंद झाल्या होत्या.

वाटेत एक गवताने शाकारलेली झोपडी दिसली, येथे चेंचू आदिवासींची वस्ती आहे असे कळले. झोपडी बंद होती पुढे आणि काही झोपड्या दिसल्या आता गवती भाग संपून ओहोळ आणि कातळांचा भाग लागू लागला अगदी सह्याद्रीत फिरल्याचा फील येऊ लागला आणि पुढे गेल्यावर धबधबा कोसळल्याचा आवाज येऊ लागला.

या पठाराच्या खाली एक गुहा आहे हीच ती अक्कमहादेवींची गुहा. वरून या गुहेचा मागमूसही लागत नाही थोडेसे वळणावर खाली जाणाऱ्या रस्त्याच्या शेवटी ही गुहा आहे. साधारण दोनएकशे फूट लांब आणि सुरवातीला दहा फूट ते शेवटी तीस फूट रुंद अशी ही गुहा आडवी पसरली आहे .

याच गुहेत बसून अक्कमहादेवींनी बराच काळ तपश्चर्या केली होती. गुहेच्या तोंडाशीच समांतर साधारण तीस फुट रुंदीचा धबधबा मोठ्ठा आवाज करत कोसळत होता.

|| धबाबा लोटती धारा धबाबा तोय आदळे ||  हे शिवथरघळीचे वर्णन तंतोतंत लागू पडत होते.

आता अंधार पडू लागला होता गुहा ठिकठिकाणी गळत होती ओल्या जमिनीमुळे आत दमट आणि कुंद झाले होते, त्यात चुलीच्या धुराचा वास मिसळला होता. रहेमानने जेवणाची तयारी केली होती त्याच्या चुलीचा आणि मोबाईल चा काय तो उजेड.

बाहेर मिट्ट काळोख होता संध्याकाळी सुंदर वाटणारी गुहा आता मात्र उगाच भिववत होती. जेवणे आटपून सर्वानी पथाऱ्या पसरल्या गप्पा सुरु झाल्या श्वापद आत येऊ नयेत म्हणून रहेमान आणि त्याचा साथीदार गुहेच्या तोंडाशी धुनी पेटवून बसले. त्याचा साथीदार थोड्याच वेळात घोरू लागला रहेमान मात्र शून्यात बघत विडी ओढत बसला होता अतिशय तुटपुंज्या गरजा असणाऱ्या हा माणूस कसल्या विचारात गढला असेल ? आमच्या गप्पा बऱ्याच वेळ चालू होत्या दमलेला रहेमान अंगाचं मुटकुळं करून अंथरुणाशिवायचं कधीच झोपी गेला होता.

दिवस ४

सकाळी लवकर उठून प्रकट स्थानाच्या दिशेने निघालो. आता हळूहळू जंगल गर्द होऊ लागले होते. वाटेत आजवर न बघितलेले मोठाले कोळी आणि त्यांची जाळी दिसली काही कोळी चक्क फ्लोरोसंट कलरचे होते.

आधी झालेल्या पावसामुळे वाटेत बऱ्याच ठिकाणी झाडे उन्मळून पडली होती, वाट चढ उतारांची चिखलाची निसरड्या कातळाची झाली होती वीराने घसरून खाते उघडले होते.

थोड्या पायपिटीनंतर एकाठिकाणी आदित्यने थांबवले प्रकट स्थान आले होते. इतुक्याच साठी केला होता अट्टाहास, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद स्पष्ट दिसत होता शिणवटा कुठल्या कुठे पळाला होता.

एक उतार उतरून खाली आल्यावर मोठया धबधब्याखाली असणारे शिवलिंग दिसले. शेजारीच पूर्वी राहणाऱ्या कोणी साधूची खोबणीमधील कनात तशीच होती. साधारण वीस फूट खाली झाडात एक मोठी ढोली होती याच ठिकाणी स्वामी तपश्चर्येस बसले होते, कुण्या वृक्षतोड्यानें वारुळावर मारलेल्या कुऱ्हाडीमुळे स्वामींची तपश्चर्या भंग पावली होती या ढोलीत सध्या कुणी भाविकाने ठेवलेल्या दगडी पादुका आहेत. सर्वानी येथे पूजा केली कोणी ध्यान तर कोणी गुरुचरित्र पठण करीत होते. निघण्याची वेळ आली.

II पुण्य फळले बहुत दिवसा भाग्य उदयाचा ठसा I आलो सन्मुख तो कैसा श्री चरण पावलो II

सर्वांच्या मनी हीच भावना होती आता जवळपास अठरा किमी चालून व्यंकटेश किनारी जायचे होते. परतीला वाटेत गुहेत जाऊन सामान घेतले आणि निघालो आता पायवाट ओळखीची झाली होती.

वाटेत चेंचूची झोपडी लागली आज कुटुंब घरात होते घरात डोकावून पहिले मोजकेच सामान असणारी ती झोपडी स्वच्छ सारवलेली होती. त्याना थोडीफार मदत करून फोटो काढून पुढे निघालो, तांदूळ हेच मुख्य अन्न असणारे बरेच आदिवासी दारूच्या आहारी गेलेले असतात.

आजचा प्रवास हा साधारण अठरा  किमीचा होता, साधारण चारच्या  सुमारास तो कालचा दमवणारा चढ आज उतार म्हणून समोर होता, पाताळगंगा दिसू लागली होती, पावले झपझप उतरू लागली अर्ध्या तासात आप्पास्वामीच्या कुटीत पोहचलो.

आप्पास्वामी राहत असलेले हे ठिकाण म्हणजे कोळ्यांची वस्ती होती सध्या तेलंगणा भागात येणारी ही पन्नास एक उंबरठ्यांची वस्ती! बरीच वेळी वनखाते येऊन हटवत असे, गावात वीज नव्हती काही घरात मात्र सोलर पॅनल दिसले.

आप्पास्वामींच्या घरात मोजके लाईट या पॅनेलवरच चालू होते. इतरांच्या मानाने अप्पास्वामींचे घर थोडे सुस्थितीत होते, घरात गाई होत्या, सध्या येणाऱ्या भाविकांमुळे थोडी उत्पन्नाचीही सोय झाली होती.. संध्याकाळी अंगणात पुणेकर मंडळींनी योगासनांचे बरेच प्रकार करून दाखवले ही पुणेकर मंडळी फिटनेस बाबत बरीच जागरूक दिसली , रात्री दहा च्या सुमारास अंगणातच पथाऱ्या पसरल्या,  वरच्या बाजूने बिबळया आला तर?  धाकधुकीतच झोप लागली. 

दिवस ५

आज अक्कमहादेवींचे मंदिर बघायचे होते साधारण अर्ध्या तासाच्या बोटीच्या प्रवासानंतर एक बरच पडझड झालेले गुहेतील मंदिर दिसले. श्री शैल्यमला येणारे बरेच भाविक या दर्शनाला सुद्धा येतात. त्यामुळे पायऱ्या- रेलिंग सुस्थितीत दिसले. आत एक अक्कमहादेवींची मोठी मूर्ती आहे. थोडेसे उजवीकडून पुढे गेल्यानंतर आत आणि एक गुहेसारखी जागा दिसली त्यातून आत गेल्यावर वटवाघळांची विष्ठेचा वास आणि तो घालवण्यासाठी टाकलेल्या कापराचा असा एकत्रित उग्र दर्प आला.

पायाखाली वाळू होती आत हळूहळू अंधार वाढू लागला. साधारण साठ सत्तर फूट आत गेल्यानंतर गुहा एकदम अरुंद आणि उंचीला कमी होऊ लागली, शेवटी तर गुढघ्यावर क्रॉल करत जावे लागले. आता जीव घुसमटू लागला होता. गुहेच्या शेवटी एक शिवलिंग होते, एक माणूस बसून ध्यान करू शकेल एव्हढ्याच उंचीची आणि रुंदीची जागा होती. पाया पडून घाईघाईने बाहेर आलो.

दमवणारा घुसमटवणारा तरीही अतिशय थ्रिलिंग अनुभव होता. आता पुढचा प्रवास हा श्री शैल्यमकडे होता. रहेमान वाटेत उतरला, पोटाच्या गरजेने स्वतःच्या धर्माला निषिद्ध असणारे हे काम गेले तीन दिवस आमच्यासोबत करत होता. व्यवसायानिमित्त आणि खासकरून ट्रेकमध्ये सह्याद्री, हिमाचल, उत्तराखंड, राजस्थान, बंगाल  येथे  अशी अनेक माणसे भेटली, नात्याची ना गोत्याची तरीही आज काही संपर्कात आहेत बाकीची संपर्कात नसली तरी स्मरणात मात्र आहेतच!!! या ट्रेकमध्ये पण आप्पास्वामी, त्यांचा मुलगा, रहेमान, त्याचा साथीदार भेटले. दुपारी शारदापीठम ला उतरलो.

आता श्री शैल्यम गाव बघण्याचा कार्यक्रम होता गणपती मंदिर आणि आसपासची देवळे बघून परत श्री शैल्यमचे दर्शन घेतले. शारदा पिठम च्या शेजारीच छत्रपती शिवाजी महाराजांचे एक भव्य मंदिर आहे. मोठाल्या बऱ्याच पायऱ्या चढून गेल्यानंतर आतील भल्या मोठ्या आणि उंच सभामंडपात छत्रपतींची मूर्ती आहे. सभोवती चारी बाजूंनी भिंतीवर महाराजांच्या आयुष्यातील प्रमुख घटनांची चित्रे आहेत. हे मंदिर बांधण्यासाठी जागा आणि खर्च येथील एका तेलगू शिवभक्तानी केलेला आहे.

महाराजांच्या मूर्ती समोर नतमस्तक होऊन निघालो आणि बाजारपेठेत फेरफटका मारला देवळासमोरील संपूर्ण रस्ता दुतर्फा दुकानाचा आहे मुख्य प्रसाद फुलांची दुकाने वगळता दवाखान्यांपासून कपड्यांपर्यंत सर्व प्रकारची दुकाने दिसली रात्री साडेआठ वाजेपर्यंत सुद्धा बाजार गजबजलेला होता विंडो शॉपिंग करून पुन्हा शारदापीठम ला आलो उद्या हैद्राबादला पुन्हा निघायचं होत!!

दिवस ६

सकाळी लावकारची बस घेऊन श्री शैल्यम सोडले. तासाभराने पुन्हा जंगलात शिरलो होतो. आभाळ भरून आलेले होते आणि थोड्याच वेळात जोरदार पावसाळा सुरवात झाली हवेत चांगलाच गारवा आला होता. बराच वेळ झोडपल्यानंतर पाऊस थांबला गाडीचा ड्रायव्हर पण हौशी निघाला, वाटेत एका ठिकाणी बस उभी करून आम्हाला फोटोसेशन करू दिले. घनदाट जंगल चिरणाऱ्या डांबरी रस्त्यावर पावसाच्या हलक्या भुरभुरीत सेल्फी झाले आणि ड्रायव्हर चे आभार मनात पुन्हा गाडीत शिरलो. हैद्राबादला दुपारी पोहचलो सामान क्लॉक रूममध्ये ठेवले. गाडीसाठी किमान सहा ते सात तासांचा अवधी होता. चारमिनार बघणे आणि शेजारीच लागून असलेल्या दागिन्यांच्या मार्केट मध्ये हिंडणे असा साधारण कार्यक्रम ठरला, बराचसा वेळ हा अर्थातच दागिने विकत घेण्यात गेला. कराची बेकरीतून बरीच खरेदी करून स्टेशनला आलो येताना हैदराबादची प्रसिद्ध बिर्याणी आणयाला विसरलो नाही.

साधारण दहाच्या सुमारास ट्रेन मध्ये बसलो. आता हैद्राबाद मागे सुटले होते, सकाळी आठच्यासुमारास पुणे आले सहा दिवस बरोबर असणारे आता आपापल्या घराकडे निघाले होते. या ट्रेक ला भेटलेल्या पुणेकरांशी चांगलीच घट्ट मैत्री झाली होती.  गाडी मुंबईच्या दिशेने निघाली होती आता घरची ओढ लागली होती. साधारण दोनच्या सुमारास ‘आमची मुंबई’ आली.

फिरण्याचा स्वार्थ आणि परमार्थ असा दुहेरी आनंद देणारा हा ट्रेक होता, ह्या ट्रेक ला सोबत असणाऱ्या निशांत वीरा अनुपा जया शीतल रोहिणी इंगळेताई सोनाली मंजुषा सारिका अभय या सर्वांचे मनःपूर्वक आभार.

माउंटन हायकर्स ने ह्या ट्रेक चे आयोजन उत्तम केले होते वेळेत प्रवास उत्तम जेवण राहण्याची खूप चांगली सोय यासाठी त्यांना फुल मार्क्स. या ट्रेक नंतर आदित्य सोबत बरेच ट्रेक झाले. या ट्रेकनिमित्त झालेल्या ओळखीचे रूपांतर आज चांगल्या मैत्रीत झाले आहे ह्या ट्रेकच्या उत्तम आयोजनासाठी माउंटन हायकर्सचे आदित्य फडतरे आणि वल्लरी पाठक यांचे खूप खूप आभार!!!

नाम घेता संकट हरे      वारी केल्या पाप सरे I

सेवा करिता भवांत तरे    चुकती फेरे चौऱ्यांशीचे II

II श्री स्वामी समर्थ II

 

Blog by: मयुरेश जाखी
Photo Credits: माउंटन हायकर्स , मयुरेश जाखी